जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्राइवेट लिमिटेडच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती : येथील औद्योगिक वसाहती मधील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांना कुठलीही सुरक्षा साधने न देता व कामाची कुठलीही माहिती न देता काम करण्यास सांगितल्याने एक कामगार मृत पावला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवरती भा. द. वि कलम ३०४ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार सुभाषराव नवसरे यांनी फिर्याद दिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
२३ जुन रोजी रात्री ९ च्या सुमारास औद्योगिक वसाहती मधील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीमध्ये कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव दशरथ मांडे (राहणार सासवड व्यंकटेश स्वप्ननगरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे) व बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गाप्रसाद शेंडे (सध्या राहणार रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे) यांनी कंपनीतील कामगारांना सुरक्षिततेची साधने न देता,तसेच कामगार सुरक्षिततेच्या साधनांचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण न देता, तसेच कामाची पद्धत असुरक्षित असून ही कामगारांना जड जॉब हाताळण्याचे प्रशिक्षण न देता,सदर ठिकाणी कुशल कामगाराची नेमणूक न करता अकुशल कामगाराकडून कंपनीमध्ये काम करून घेऊन कर्तव्यावर हलगर्जीपणा, निष्काळजीपणा केला.
त्यामुळे कामगार शिवबाबू कमलेश शाहू (वय २३ मूळ राहणार मनकापुर तालुका मजखनपूर जिल्हा कोसंबी उत्तर प्रदेश सध्या रा. ढोकसांगवी पाचंगे वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे) याच्या अंगावर जड जॉब पडून त्यात जखमी होऊन मृत पावल्याने कंपनीचे प्रोडक्शनचे मॅनेजर जयदेव दशरथ मांडे व बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गादास शेंडे यांच्या विरुद्ध भादवी ३०४ अ अन्वये कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. 20 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडके हे करीत आहेत.





