Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

लातूर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत त्यांनी अनेकदा प्रशासन व्यवस्था आणि सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
दुसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे यांनी एका मोर्च्यादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्त्यव केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला. यानंतर त्यांनी जरांगेच्या विरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा केला. बीडनंतर आता लातूर जिल्ह्यातल्या किनगाव पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता मनोज जरांगेच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
४ जानेवारीच्या जाहीर सभेत जरांगे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान या तक्रारीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे.विशिष्ट समाज आणि मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. स्थानिक नेते किशोर मुंडे यांनी याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





