हक्काची बॅंक जपण्याची जबाबदारी पार पाडा

नगर -नगर जिल्हा सहकारी बॅंकेकडे साडे आठ हजारांपेक्षा जास्त ठेवी आहेत. जिल्हाभरात बॅंकेच्या 287 शाखा आहेत. साडेआठ हजार कोटी ठेवी याचा अर्थ सर्वसामान्यांनी हा बॅंकेवर टाकलेला विश्वास आहे. संचालक मंडळ विश्वस्त म्हणून चांगले काम करत आहे. संस्थेचे हित महत्वाचे आहे. संस्था मोडकळीस आली तर काय हे वेगळे सांगायला नको. राष्ट्रीयीकृत बॅंक पाठीशी उभी राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा बॅंक ही आपली हक्काची संस्था आहे. ही संस्था जपण्याची जबाबदारी पार पाडा, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, नरेंद्र घुले, सीताराम गायकर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रशांत गायकवाड, करण ससाणे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी आदी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, की राज्यात ज्या काही पाच ते सात बॅंका सक्षमपणे कार्यरत आहेत त्यात नगरची बॅंक आहे. जिथे राजकारण केले गेले, बॅंकिंग व्यवस्था चालविली गेली नाही, योग्य पद्धतीने कर्ज वाटप झाले नाही त्या बॅंका अडचणीत आल्याचे दिसते. ठेवीदारांनी ठेवी ठेऊन विश्वास टाकला आहे. आता या ठेवींचे रक्षण करणे, व्यवस्थित कर्ज वाटप करणे, कर्ज वसुली व्यवस्थित करणे तसेच कर्ज घेतील त्यांना मदतही करणे ही जबाबदारी पार पाडायची आहे. बॅंक म्हणून संचालक मंडळाने ही जबाबदारी पार पाडली आहे.
बॅंक साखर कारखान्यांना कर्ज देते. तेव्हा कारखान्यानेही या कर्जाची वेळेत परतफेड करणे गरजेचे आहे. बॅंकेचा एनपीए वाढला आहे तेव्हा हा एनपीए कमी कसा करता येईल, हे उद्दीष्ट ठेऊन प्रत्येकाने काम करणे आवश्यक असल्याचे थोरात म्हणाले.
प्रास्ताविकात व्हाइस चेअरमन माधवराव कानवडे यांनी बॅंकेतील ठेवी, कर्जाची स्थिती, वसुली, नफा, कर्ज वितरण यांबाबत माहिती दिली. बॅंकेकडे आजमितीस साडेआठ हजार कोटींच्या ठेवी आहेत तसेच बॅंकेला 50 कोटी रुपये नफा मिळाला आहे. तसेच बॅंक लवकरच मोबाइल बॅंकिंग सुरू करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना बॅंकेने सुरू केली असून याद्वारे सोलर पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.
सभागृहात हशा
आपण आता येथे सर्व आहोत. कधी हे सरकार असते तर कधी ते सरकार असते. अशा वेळी पण मदत करायला पाहिजे. आघाडी सरकार आले त्यावेळी दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दीड हजार कोटी रुपये बॅंकेला मिळाले. वसुलीचा काहीच त्रास झाला नाही. त्यानंतर नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना 50 हजार मदतीचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचे वाटप मात्र बॅंकेने थांबवले, वाटप लवकर करा, असे थोरात यांनी व्यासपीठावर उपस्थितांकडे पाहून म्हटले. त्यावेळी सभागृहात हशा पिकला. त्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.





