देहूरोड : उर्से येथून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जाणाऱ्या लाकडी ड्रमने भरलेले एका मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१४ ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर घडली आहे. चालकाने सावधगिरी बाळगत देहूरोड पोलीस ठाण्यामध्येच ट्रक घातला. लागलीच तेथील पाण्याने ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुमारे एक तास उलटून गेल्या नंतरही कॅन्टोन्मेंट बोर्ड अथवा इतर कोणतेही अग्निशामक वाहन आले नव्हते. याबाबत अधिक माहिती अशी की, उर्से येथील फिनोलेक्स केबल कंपनीतून केबल गुंडाळण्यासाठी असणारे लाकडी ड्रम घेऊन आझाद हिंद ट्रान्सपोर्ट कंपनीची एम एच 14 ए एस 8229 हा मालट्रक मुंबई पुणे महामार्गावरून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जात होता. देहूरोड पोलीस ठाणे पासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ ट्रकला अचानक आग लागली. यावेळी ट्रकच्या पाठीमागे असणारे दुचाकीस्वार कैलास पाटील व गोकुळ पाटील यांनी चालकाला सावध केले. देहूरोड पोलीस ठाण्याजवळील सेंट्रल चौकात सिग्नल मुळे गर्दी होती. गर्दी सारवत दुचाकीस्वाराने जवळ असणाऱ्या पोलीस ठाण्यातच पेटलेले वाहन घेण्यास सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाला कळवले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या आदेशान्वये उपस्थित असणाऱ्या सर्वच पोलिसांच्या मदतीने पंधरा मिनिटातच आग आटोक्यात आणली. मात्र एक तास उलटून गेल्यानंतरही कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशमन दल पोहोचलेच नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणी आला आहे.