पिंपरी | इनरव्हील क्लब तर्फे करियर विषयक मार्गदर्शन सत्र

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील करियर संदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांना तोंड देत असताना शिस्त, समर्पकता आणि अभ्यासात सातत्य असेल तर आपण सुयश मिळवू शकता, असे कार्तिक यांनी सांगितले.
विद्यार्थीनींनी नकारात्मकतेपासून दूर राहावे. पुरुषी वर्चस्वाला दूर ठेवायचे असेल तर महिलांनी सक्षम होणे जरुरीचे आहे. राष्ट्र प्रथम हा विचार सतत मनात असला पाहिजे. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी अंगातील कला जोपासा, असा मोलाचा सल्ला सत्यसाई कार्तिक यांनी दिला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य मिसाळ यांनी मुलींसाठी एमपीएससी, यूपीएससी केंद्र सुरू करत असल्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव योगवेंद्र खळदे उपस्थित होते. मुग्धा जोर्वेकर आणि रश्मी थोरात यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. इनर व्हील क्लब तर्फे ज्योती जाधव, संगीता जाधव, नीलिमा बारटक्के, जयश्री दाभाडे, काजल गारोळे, संगीता शेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.




