लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एका रेनॉल्ट कंपनीच्या चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. ही घटना खंडाळा घाटात बॅटरी हिलजवळ आज शनिवारी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ११.४५ च्या सुमारास खंडाळा घाटातून जात असताना रेनॉल्ट कंपनीच्या एका कारने अचानक पेट घेतला. घाटामध्ये वाहतूक संथ गतीने सुरू असल्यामुळे गाडीच्या इंजिनचे तापमान वाढले असावे आणि त्यामुळेच गाडीने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही प्रमाणात संथ झाली होती, मात्र पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.