AUS A vs IND A 3rd T20 : टीम इंडियाची हाराकिरी कायम; ऑस्ट्रेलियाचे तिसऱ्या सामन्यासह मालिकेवर 3-0 ने निर्विवाद वर्चस्व…

India Women-A vs Australia Women-A Team, T20 Series : ऑस्ट्रेलियन महिला ‘अ’ संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय महिला ‘अ’ संघाचा 7 गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन महिला ‘अ’ संघाने मालिकेत 3-0 ने निर्भेळ यश संपादन केलं आहे. भारतीय संघाला एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही.
ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 5 धावांनी तर दुसरा सामना 8 विकेटने जिंकला. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियन संघाने ताहलिया मॅकग्राच्या दमदार खेळीमुळे सहज पार केले.
🇦🇺 Australia A 3-0 India A 🇮🇳
Captain Tahlia McGrath smacks a 22-ball half-century as Australia A clean sweep the #AUSAvINDA T20 series. pic.twitter.com/VAGeLBLhHr
— Women’s CricZone (@WomensCricZone) August 11, 2024
ताहलिया मॅकग्राचे शानदार अर्धशतक…
ऑस्ट्रेलियाकडून ताहलिया मॅकग्राने शानदार फलंदाजी केली. तिने 22 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांची नाबाद खेळी खेळली. तिच्यामुळेच ऑस्ट्रेलियन महिला-अ संघाने अवघ्या 13.5 षटकांत तीन गडी गमावून 121 धावा करून विजय मिळवला. ताहलिया मॅकग्राने वेगवान गोलंदाज शबनम शकीलच्या चेंडूवर सलग तीन चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. ताहलियाने चार्ली नॉट (19) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. सलामीवीर विल्सननेही (39 धावा, 26 चेंडू, पाच चौकार, एक षटकार) उपयुक्त खेळी खेळली.
भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी…
भारतीय महिला ‘अ’ संघासाठी फक्त किरण नवगिरे आणि कर्णधार मीनू मणी यांनी काही काळ विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, परंतु उर्वरित फलंदाज चांगली कामगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरले. किरण नवगिरे हिने 38 धावांचे तर मीनू मणी हिने 22 धावांचे योगदान दिले. भारताने 47 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या ज्यातून संघ सावरण्यात अपयशी ठरला. किरण आणि मीनू यांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या आणि संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली.ऑस्ट्रेलियातर्फे निकोला हॅनकॉक, ग्रेस पार्सन्स आणि मैटलान ब्राउन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या टी-20 मालिकेतील अपयशानंतर आता भारत ‘अ’ संघ 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या एकमेव ‘अनधिकृत कसोटी’पूर्वी यजमानांविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 14 ऑगस्ट, दुसरा सामना 16 ऑगस्ट तर तिसरा सामना 18 ऑगस्ट रोजी होईल.



