Captain Smit Machhar : फ्लाईदुबईच्या 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टनबाबत गुजरातचा मोठा निर्णय; पुरस्कार जाहीर
Captain Smit Machhar : फ्लाईदुबईच्या एफझेड-१०७३ विमानातील आपत्कालीन परिस्थितीत धैर्य दाखवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांना गुजरात सरकारकडून ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

Captain Smit Machhar : फ्लाईदुबईच्या विमानातील आपत्कालीन परिस्थितीत धैर्य आणि प्रसंगावधान दाखवून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांना गुजरात सरकारकडून ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’ देण्यात येणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या एफझेड-१०७३ या विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार होते. विमानात कॉकपिटमध्ये घडलेल्या कथित हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे कौतुक केले. त्यांच्या असामान्य साहस आणि मानवतेच्या भावनेचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मित यांच्या धैर्यामुळे गुजरात आणि भारताचे नाव जगभर पोहोचल्याचेही पटेल यांनी म्हटले. त्याचबरोबर कॅप्टन स्मित लवकर बरे व्हावेत, यासाठी संपूर्ण गुजरातकडून प्रार्थना केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानात नेमके काय घडले?
फ्लाईदुबईचे एफझेड-१०७३ हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. उड्डाणादरम्यान विमानाने आपत्कालीन संदेश पाठवला. त्यानंतर विमानाची उंची ३४ हजार फुटांवरून अचानक १७ हजार फुटांपेक्षा अधिक खाली आली.
या घटनेनंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबूक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्देलअजीज विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आला. विमान सुरक्षितपणे तबूक येथे उतरवण्यात आले.
विमानातील कॉकपिटमध्ये झालेल्या कथित हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले. विमानाची स्थिती बिघडल्यानंतर प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांनीही परिस्थिती हाताळण्यासाठी हस्तक्षेप केला. गंभीर दुखापत झालेली असतानाही कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या धैर्याचे भारतासह परदेशातही कौतुक होत आहे.
पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. गंभीर जखमी असतानाही त्यांनी संयम आणि धैर्य दाखवून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मोदी यांनी म्हटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक सार्वजनिक व्यक्तींनीही कॅप्टन स्मित यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, विमानाच्या कॉकपिटमध्ये नेमकी घटना कशी घडली आणि कथित हल्ल्यामागील कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. या घटनेमागील संपूर्ण कारण आणि परिस्थिती तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
कॅप्टन स्मित यांचा जुना व्हिडिओ चर्चेत
दरम्यान, सुमारे वर्षभरापूर्वी कॅप्टन स्मित मच्छार यांनी एका संवादात विमानातील केबिन क्रूच्या भूमिकेबाबत केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. संकटाच्या वेळी प्रशिक्षित केबिन क्रू प्रवाशांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी त्या वेळी सांगितले होते. आता विमानातील ताज्या घटनेनंतर त्यांचा हा जुना व्हिडिओ पुन्हा प्रसारित होत आहे.





