न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही भारतीय संघाचे पानिपत झाले. या पराभवाला आता कारणे शोधली जातील. खापर एखाद्याच खेळाडूवर फोडले जाईल व बाकीचे नामानिराळे राहतील. परंतु तसे होऊ नये. कारण पराभवाला सगळेच जबाबदार आहेत. त्यातही मुख्य जबाबदार आहेत कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली. कदाचीत प्रशिक्षक गौतम गंभीरही….!!
संघाचे डावपेच हेच आखत होते व त्यानुरूप खेळणे संघाचे काम होते. त्यात कोहली व रोहितचे अपयश तर लख्ख दिसले. त्यांना हेच समजत नव्हते की आपण कसोटी सामना खेळत आहोत की एकदिवसीय सामना. कोहली ज्या पद्धतीने धावबाद झाला, ते पाहता एखादा नवशिकाही हसला असेल. अरे जर असा खेळून त्याला कसोटी संघात कायम ठेवत असतील तर निवड समितीचीही दया येते.
आपल्या गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले होते. पहिल्या डावात न्यूझीलंडला 236 धावांत रोखले. त्यात रवींद्र जडेजाने 5 बळी घेताना आपली उपयुक्तता सिद्ध केली. वॉशिंग्टन सुंदरनेही 4 गडी बाद करत आपली निवड सार्थ ठरवली. त्यानंतर पहिल्या डावात आपल्या फलंदाजांनी कच खाल्ल्यावरही आपण शुभमन गिल, ऋषभ पंत व तळात वॉशिंग्टन सुंदर यांच्या फलंदाजीने आपण आघाडी घेतली. इथपर्यंत सगळे ठीक वाटत होते. त्यातच दुसरा व सुरु झाला व न्यूझीलंडच्या फलंदाजीला गळती लागली.
विल यंगच्या अर्धशतकानंतरही आपण त्यांना दोनशे धावांच्या आत रोखले. आता लक्ष्य सोपे होते. विजयासाठी अवघ्या 147 धावा हव्या असताना आपल्या फलंदाजांनी पुन्हा एखदा कच खाल्ली. पंतने जो प्रतिकार केला तो कौतुकासापद होता. मात्र, त्याला साथ देण्याची एकाही फलंदाजाने जिगर दाखवू नये याची लाज वाटते.
कर्णधार रोहित शर्मा 11, विराट कोहली 1, यशस्वी जयस्वाल 5, शुभमन गिल 1, सर्फराज खान 1 ही आपली फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तळता वॉशिंग्टन संदरने दुहेरी धावा केल्या. तो 25 चेंडू खेळपट्टीवर उभा राहिला. रवीचंद्रन अश्विन तर 29 चेंडू खेळपट्टीवर उभा होता. थोडीतरी लाज वाटावी रोहित व कोहलीला. या दोघांनी मिळून 18 चेंडूत 12 धावा केल्या आहेत. अरे त्यापेक्षा निवृत्ती घ्या. नव्या खेळाडूंना तरी संधी मिळेल.
पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपत असताना कोहली ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्यासाठी त्याला किमान पुढील पाच दौरे संघातून बाहेर काढले पाहीजे. राहुल द्रविड असतानाचा भारतीय संघ जगजेत्ता वाटत होता. गौतम गंभीरचा संघ पळपुट्या वाटत आहे. हाच फरक आहे या दोन प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाचा. आता म्हणे आपण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा खेळायची स्वप्ने पाहात आहोत. या सलग तीन कसोटी पराभवांमुळे या स्वप्नांचा पार चक्काचुर झाला आहे. चला तयारीला लागा आणखी एका अक्षम्य पराभवासाठी.