Politics News : ‘आमच्याकडे खरोखर दुसरा पर्याय नव्हता’; माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये जाण्यामागची भूमिका केली स्पष्ट, सर्वकाही सांगितलं…
Politics News : कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यामागची कारणे सांगितली. स्वतःचा पक्ष अपयशी ठरल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Politics News : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर समर्थकांना पुढे काय करायचे, असा प्रश्न होता. त्यामुळे स्वतःचा पक्ष स्थापन केला. मात्र, हा पक्ष अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आमच्याकडे खरोखर दुसरा पर्याय नव्हता,’ असे सिंह यांनी सांगितले.
‘द ट्रिब्यून’ला दिलेल्या मुलाखतीत अमरिंदर सिंह यांनी २०२१ मध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घटना सांगितली. काँग्रेसमध्ये काही बदल होणार असल्याची जाणीव झाल्याने आपण पक्षाध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. सुरुवातीला राजीनामा न देण्यास सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा फोन करून राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला.
राजीनाम्यानंतर समर्थकांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारणा केली. त्यातून पंजाब लोक काँग्रेसची स्थापना करण्यात आली. मात्र, हा पक्ष फारसा पुढे जाऊ शकला नाही. अखेर भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसमध्ये परत जाण्याचा आपला विचार नव्हता. तसेच अकाली दलातही पुन्हा जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे भाजपमध्ये जाणे हाच उपलब्ध पर्याय असल्याचे सिंह यांनी सांगितले.
अमरिंदर सिंह यांनी भाजपमध्ये गेल्यानंतरच्या अनुभवाबाबतही भाष्य केले. भाजपमध्ये चार वर्षे राहून आपल्याला विशेष काही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबमधील राजकारण आणि धोरणांबाबत पक्षाने आपल्याशी चर्चा केलेली नाही, असा दावाही त्यांनी केला. पंजाबच्या राजकारणाचा सुमारे सहा दशकांचा अनुभव असल्याने आपली मते पक्षाने विचारात घ्यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी सिंह यांनी आपण भाजप सोडत असल्याच्या चर्चाही फेटाळल्या. पंजाबबाबत आपली मते पक्षासमोर मांडणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





