करोनावर उपचारासाठी आता कॅप्सूल

नवी दिल्ली – करोनावर आता कॅप्सूलद्वारे उपचार केले जाणार असून यासंदर्भातील चाचणीचा तिसरा टप्पाही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. भारतात करोना व्हायरसच्या उपचारासाठी मोलनुपिरावीर ओरल कॅप्सूलची तिसऱ्या फेजची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती औषध निर्मिती करणारी कंपनी ऑप्टीमस फार्माने दिली आहे.
सल्लागार समितीची 30 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. ज्यामध्ये सौम्य ते मध्यम कोविड संसर्गाच्या उपचारांसाठी मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन मंजुरीसाठी केलेल्या विनंतीचा विचार केला जाईल.
त्याचप्रमाणे, उपचार घेत असलेल्या लोकांमध्ये अभ्यासाच्या 10 व्या दिवशी 91.5 टक्के आरटी-पीसीआर निगेटिव्ह नोंदवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
ऑप्टिमस फार्माचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले, कोविड-19 साठी अत्याधुनिक आणि फायदेशीर उपचार पर्याय विकसित करणे आणि कमीत कमी वेळेत रोगाचा प्रतिबंध करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

