पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आवश्यक प्रस्तावास बुधवारी (दि.11) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयासाठीची जागा निश्चित करून यासंबंधिचा अहवाल राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बुधवारी (दि.11) झालेल्या सर्वसाधारण सभेत आरोग्य समितीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंबंधिचा प्रस्ताव मांडला. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यावर बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत त्यास मंजुरी देण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजित सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, उपाध्यक्ष विवेक यादव आणि नगरसेवक आदी उपस्थित होते.
सरदार पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोनशे बेडचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबतची केंद्र शासनाची योजना आहे. त्यासाठी 189 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते. यामध्ये राज्य शासनमार्फत 25 आणि केंद्र शासनातर्फे 75 टक्के रकमेचा समावेश आहे.
बोर्डाच्या हद्दीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाची मार्गदर्शक तत्वांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबरोबरच प्रशासनाच्यावतीने आवश्यक प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियमानुसार वेगळी समिती स्थापन करावी लागते. त्यानुसार भविष्यात समितीची स्थापनादेखील करण्यात येईल.’