Diwali Trip: दिवाळीत घरी जाता येत नाहीये? निराश होऊ नका! भारतातील ‘या’ ५ सुंदर ठिकाणी फिरून सुट्ट्या बनवा अविस्मरणीय
Diwali Trip भारतात अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे दिवाळीच्या काळात रोषणाई, उत्साह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींसोबत या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करू शकता. चला तर जाणून घेऊया दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी भारतातील पाच सुंदर ठिकाणे.

Diwali Trip: दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, फराळाची तयारी, दिव्यांची रोषणाई आणि कुटुंबासोबत साजरा होणारा आनंदाचा क्षण डोळ्यांसमोर येतो. दिवाळीचा सण आपल्या माणसांसोबत साजरा करण्याची मजाच काही और असते. मात्र, अनेकदा कामाचा व्याप, शिक्षण किंवा इतर काही कारणांमुळे काही लोकांना दिवाळीत घरी जाता येत नाही. अशावेळी सणाच्या दिवसांत घरापासून दूर असल्यामुळे थोडे वाईट वाटू शकते.
पण यंदा दिवाळीत घरी जाता येत नसेल, तर निराश होण्याची गरज नाही. तुम्ही या सुट्ट्यांचा उपयोग फिरण्यासाठी आणि नवीन ठिकाणे अनुभवण्यासाठी करू शकता. भारतात अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे दिवाळीच्या काळात रोषणाई, उत्साह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींसोबत या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करू शकता. चला तर जाणून घेऊया दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी भारतातील पाच सुंदर ठिकाणे.
१. अयोध्या : दीपोत्सवाचा भव्य सोहळा अनुभवायचा असेल तर!
दिवाळीच्या काळात फिरण्यासाठी अयोध्या हे एक खास ठिकाण आहे. भगवान श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथील मंदिरांची सजावट, दिव्यांची रोषणाई आणि सरयू नदीच्या घाटांवरील सुंदर वातावरण पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. अयोध्येतील दीपोत्सवाचा अनुभव घेण्याची संधीही पर्यटकांसाठी खास असते.
काय पाहाल? राम मंदिर, हनुमानगढी, कनक भवन आणि सरयू नदीचे घाट.
२. वाराणसी : गंगा आरतीचा अनुभव ठरेल अविस्मरणीय!
वाराणसी हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक शहरांपैकी एक आहे. दिवाळीच्या काळात येथील घाट आणि मंदिरांमध्ये वेगळीच रौनक पाहायला मिळते. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर आपल्या सुंदर घाटांसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी दशाश्वमेध घाटावर होणारी गंगा आरती पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. शांत वातावरण, मंदिरांच्या घंटांचा आवाज आणि नदीकाठची रोषणाई मनाला प्रसन्न करते.
काय पाहाल? काशी विश्वनाथ मंदिर, दशाश्वमेध घाट, अस्सी घाट आणि सारनाथ.
३. जयपूर : दिवाळी साजरी करा शाही थाटात!
राजस्थानची राजधानी जयपूर म्हणजे ऐतिहासिक वास्तू, रंगीबेरंगी बाजारपेठा आणि राजेशाही संस्कृतीचा सुंदर संगम. दिवाळीच्या काळात जयपूरमधील बाजारपेठा आणि ऐतिहासिक इमारती आकर्षक रोषणाईने सजवल्या जातात. येथील हवामहल आणि सिटी पॅलेसची सुंदर वास्तुकला पर्यटकांना आकर्षित करते. खरेदीची आवड असणाऱ्यांसाठी जयपूरमधील बाजारपेठाही उत्तम पर्याय आहेत.
काय पाहाल? हवामहल, आमेर किल्ला, सिटी पॅलेस, जलमहल आणि जोहरी बाजार.

Diwali Trip
४. उदयपूर : तलावांच्या शहरात घालवा निवांत वेळ!
राजस्थानमधील उदयपूर हे आपल्या सुंदर तलावांसाठी आणि राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. रोजच्या धावपळीपासून दूर जाऊन शांत वातावरणात काही दिवस घालवायचे असतील, तर उदयपूरला भेट देऊ शकता. येथील तलावांचे सुंदर दृश्य, ऐतिहासिक महाल आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
काय पाहाल? पिछोला तलाव, सिटी पॅलेस, फतेहसागर तलाव, सहेलियों की बाडी आणि जग मंदिर.
५. ऋषिकेश : निसर्गासोबतच साहसाचाही आनंद घ्या!
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये डोंगर, नद्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर ऋषिकेशला भेट देऊ शकता. उत्तराखंडमधील हे सुंदर ठिकाण गंगा नदी, डोंगररांगा आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. येथे फिरण्यासोबतच साहसी पर्यटनाचाही आनंद घेता येतो. नदीकाठचे सुंदर दृश्य आणि संध्याकाळची गंगा आरती तुमची सहल अधिक खास बनवू शकते.
काय पाहाल? त्रिवेणी घाट, राम झुला, लक्ष्मण झुला परिसर, नीलकंठ महादेव मंदिर आणि बीटल्स आश्रम.
सहल ठरवण्यापूर्वी ही काळजी घ्या!
दिवाळीच्या काळात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे प्रवासाची तिकिटे आणि हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवा. तसेच स्थानिक हवामान, पर्यटनस्थळांच्या वेळा आणि प्रवासाचे नियोजन तपासून घ्या. योग्य नियोजन केल्यास घरापासून दूर असतानाही यंदाची दिवाळी आनंदात आणि संस्मरणीय बनवता येईल.

