“लोकांचा आक्रोश परवडणार नाही…”; टोल दरवाढीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई – मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) मागील चार दिवसांपासून टोलदर वाढी विरोधात आंदोलन करत आहेत. आज त्यांच्या ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर देखील सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षापासून मनसे टोल नाक्यांबाबत आंदोलन करत आहे. मनसे आंदोलनातून ६५ टोलनाके बंद झाले. निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिले होते. टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रस्ते नीट बांधले जात नाही तर कर का घेतला जातो?, रोड टॅक्स आणि टोलही भरला जातो, हे पैसे जातात कुठे? टोलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखल केलेली याचिका का मागे घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, “एकीकडे लोकांना आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे टोल घ्यायचे, जनतेचेही आश्चर्य वाटते, जे पिळवणूक करतात त्यांनाच मतदान केले जाते. अशा लोकांसाठी एक माणूस मेल्याने काही फरक पडणार नाही. मला आज अनेक लोकं भेटली, त्यांनी निवेदने दिली. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईन आणि या सर्व गोष्टी मी सांगेन, त्यानंतर वाढीव टोलचं काय होणार हे सांगू शकेल.”
तसेच मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, निवडणूका तोंडावर आल्या आहेत. लोकांचा आक्रोश त्यांना परडवणारा नाही, असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला. तर अविनाश जाधव यांना उपोषण वगैरे आपलं काम नाही, लोकांसाठी जीव गमावू नकोस, एक माणूस मेल्याने यांना काही फरक पडत नाही, असे सांगत उपोषण मागे घेण्यास सांगितले.





