Kunal Kamra : …तोपर्यंत अटक करता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा कुणाल कामराला दिलासा

मुंबई : कॉमेडिअन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार, 16 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. याप्रकरणी जवळपास तीन तासांची सुनावणी झाल्यानंतर त्याच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच, जोवर यावर निर्णय दिला जात नाही, तोवर कुणाल कामरा यांना अटक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कुणाल कामराच्या वकिलांनी त्याच्याविरोधात करण्यात आलेल्या एफआयआर रद्द केल्या जाव्यात आणि त्याची चौकशी पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली. कलम 19-ए नुसार हे प्रकरण हास्य अभिनेत्याच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याशी संबंधित आहे. त्यानुसार कामराकडून काहीही चूक झालेली नाही. यंत्रणांचा वापर करून एखाद्या व्यक्तिला घाबरवायचा आणि त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच हे प्रकरण दुर्मिळ आहे.
ज्या व्यक्तीची बदनामी करण्यात आली त्यांनी काहीच तक्रार केली नसल्याचा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी केला. अशा प्रकारे गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. उद्धव ठाकरे यांनी 2024 च्या निवडणूक प्रचार मोहिमेत एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले होते. तेव्हा तर कोणीच एफआयआर केली नाही. पण एका स्टॅण्ड अप कॉमेडिअनने टीका केल्यावर लगेच त्याच्यावर टीका झाली. जर तुम्ही सार्वजनिक जीवनातील व्यक्ती असाल तर तुमच्यावर टीका होणे अपरिहार्य असल्याचा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला.





