गुन्हे शाखेकडून दोघे ताब्यात : 3 लाख 18 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नारायणगाव (पुणे)-बेकायदेशीर गांजा घेऊन जाणाऱ्या दोन जणांना मांजरवाडी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस यांनी संयुक्तिक कारवाईत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18 हजार रुपये किमतीचा सव्वा किलो गांजा आणि 3 लाख किमतीची स्विफ्ट कार असा 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वैभव संजय राऊत (वय 23, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) व अभिषेक शंकर शिवले (वय 24, रा. वाजगे आळी, नारायणगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर एनडीपीएस कायद्या कलम 8 क, 20 क प्रमाणे गुन्हा दाखल आहे. फिर्याद पोलीस हवालदार शंकर विठ्ठल जम यांनी दिली. मांजरवाडी फाटा ते जाधववाडी या रस्तयावर मनोरंजन नावाच्या हॉटेलसमोर लाल रंगाची स्विफ्ट कारमधून (एमएच 14 एचझेड 7333) गांजा विक्रीस नेत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना व त्यांच्या पथकाला मिळाली. या पथकाने कारची झडती घेतली असता लाल रंगाची पिशवी प्लॅस्टिक चिकटपट्टी लावून त्याचा गोलाकार केलेला सव्वा किलो वजनाचा एक गांजाचा पुडा मिळून आला.
- पोलिसांवर राजकीय दबाव
गांजा प्रकरणात शिवले याला सोडविण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या नेत्याबरोबर काही मान्यवर पदाधिकारी यांनी पोलिसांवर दबाव आणला होता. पण पोलिसांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात या अगोदर घडलेल्या प्रकारांमुळे कोणालाही पाठीशी न घालता गुन्हा दाखल केला आहे. स्विफ कारचा मालक हा मांजरवाडी येथील एका पक्षाचा मोठा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गांजा प्रकरणात पुढील तपासात पोलिसांना या अवैध धंद्यातील मोठा सूत्रधार व मोठी साखळी मिळण्याची शक्यता आहे.