Pune District : काकड आरतीपासून वैयक्तिक संपर्कापर्यंत उमेदवारांचा जोर

पिरंगुट : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिरंगुट-भूगाव गटातील इच्छुक उमेदवारांनी गावभेट दौर्यांना वेग दिला आहे. वैयक्तिक संपर्क वाढवून मतदारांशी नातं घट्ट करण्यासाठी उमेदवार विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, गावोगावी सुरू असलेल्या काकड आरतींनाही उपस्थित राहून संवाद साधत आहेत.
या गटासाठी जिल्हा परिषदेचे आरक्षण मागास प्रवर्गासाठी ठरले असून, पिरंगुट व भूगाव गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकांसाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. हा गट परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 2007, 2012 आणि 2017 या तीनही निवडणुकांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. पूर्वीचा पिरंगुट-बावधन गट हा बावधन आणि सूस गाव महापालिकेत गेल्याने आता नव्या प्रभागरचनेत पिरंगुट-भूगाव गट तयार झाला आहे.
2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजली कांबळे यांनी जिल्हा परिषदेवर विजय मिळवला होता. पिरंगुट गणातून राधिका कोंढरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि बावधन गणातून विजय केदारी (शिवसेना) हे विजयी झाले होते. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात त्रिकोणी लढत होण्याची चिन्हे आहेत.
इच्छुक उमेदवार
या गटात जिल्हा परिषद सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून: माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून: माजी सभापती महादेव कोंढरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून: शिवआरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव (आबा) शेळके, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुडले आणि माजी सभापती भानुदास पानसरे हे इच्छुक असल्याचे समजते. या सर्व उमेदवारांनी आपल्या गटात आणि गावात मतदारांशी संपर्क साधत, श्रद्धेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याची रणनीती अवलंबली आहे.





