प्रभात वृत्तसेवा मंचर – नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना अर्ज केवळ इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संगणकावरील सर्व पर्याय, सूचना आणि कागदपत्रांचा तपशील इंग्रजीत असल्याने अर्ज भरताना उमेदवार आणि महा-ई-सेवा केंद्र चालकांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना इंग्रजी भाषेचे मर्यादित ज्ञान असल्याने अर्जातील तांत्रिक शब्द आणि पोर्टलवरील सूचना समजून घेण्यात अडचण येत आहे. यामुळे अर्ज चुकीचा भरला जाण्याची भीती कायम आहे. तसेच, प्रत्येक पायरीवर मदत घेण्यासाठी उमेदवारांना अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागत आहे.महा-ई-सेवा केंद्र चालकांनाही इंग्रजी मजकुराचे मराठीत स्पष्टीकरण देत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने एकाच उमेदवाराचा अर्ज भरताना अधिक वेळ लागत आहे. स्थानिक स्तरावर उमेदवारांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, उमेदवारी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया मराठी भाषेत उपलब्ध करावी, जेणेकरून सर्वसामान्य उमेदवारांना सहजपणे अर्ज भरता येईल. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत मातृभाषेत सुविधा उपलब्ध नसणे, ही ग्रामीण भागासाठी मोठी अडचण ठरत असून यावर तातडीने उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.