प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी विविध माध्यमांद्वारे प्रचाराची तयारी सुरू केली आहे. प्रचाराच्या पारदर्शकतेसाठी निवडणूक विभागाने कडक पावले उचलली आहेत. कोणत्याही प्रकारचे माध्यमांमधील जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी पूर्वप्रमाणन घेणे, आता अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी नगरपंचायत कार्यालयात एक खिडकी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी वडगाव नगरपंचायतची निवडणूक जाहीर केली. निवडणुकीदरम्यान मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि समाजमाध्यमांवरील प्रचार मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही तसेच अपप्रचार आणि दिशाभूल होणार नाही, याची दक्षता म्हणून या नियमावर कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी तिथेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. कुठल्या माध्यमातील जाहिरातीला पूर्वप्रमाणन आवश्यक दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क, युट्यूब, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आकाशवाणी, खाजगी एफएम, सिनेमा थिएटर, सार्वजनिक ठिकाणांवरील ऑडिओ-व्हिज्युअल स्क्रीन, ई-पेपर, बल्क एसएमएस, व्हॉईस कॉल्स आणि वेबसाईटवरील सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन घेणे बंधनकारक आहे. अर्ज प्रक्रियेचे नियम जाहिरात प्रसारित करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी एक खिडकी कक्षात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणन अर्जासोबत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार किंवा पक्ष पदाधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रित प्रती जोडाव्या लागतील. आवश्यक तपासणीनंतरच नगरपंचायत पूर्वप्रमाणन प्रमाणपत्र देईल. पूर्वप्रमाणन न घेतल्यास कोणत्याही प्रसारमाध्यमांना जाहिरात प्रदर्शित करण्यास मनाई असेल. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारावर निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.