भोर : भोर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला होणार होती. परंतु अचानक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी १९ दिवस पुढे ढकलल्याने निकालासाठी उमेदवारांना दीर्घ कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रदीर्घ काळात उमेदवारांना चिंतेत राहावे लागणार आहे. उमेदवारांना एक एक दिवस मोठा वाटत असून या प्रदीर्घ कालावधीत उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांनाही मानसिक तणावाला सामोरे जावे लागणार आहे. भोर नगरपरिषदेची नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीची निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी अटीतटीची झाली आहे. आपल्या प्रतिष्ठेसाठी विद्यमान आमदार शंकर मांडेकर भोरमध्ये काही दिवस तळ ठोकून बसले होते. तर अस्तित्वासाठी माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही मोठी ताकद पणाला लावली होती. मतदानाच्या दिवशी २ डिसेंबरला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते बुथवर कार्यरत होते, मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत होते. तर आमदार शंकर मांडेकर व माजी आमदार संग्राम थोपटे शहरातील बुथवर जाऊन भेटी देत होते. मतमोजणी लांबणीवर पडल्यानंतर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मात्र चौकाचौकातून व चहाच्या हॉटेलमधून तसेच गल्लीबोळातून कोण निवडून येईल ? याची चर्चा रंगली होती. १० प्रभागातून प्रत्येकी २ असे एकूण २० नगरसेवक निवडून येणार असून कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार निवडून येणार या चर्चेला रंगत आली होती. मतदान करताना २ नगरसेवक पदाच्या उमेदवारांना तर १ मतदान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला करावयाचे होते, असे एकूण ३ मतदान मतदाराला करावयाचे होते. प्रचार करताना पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तीनही मतदान आमच्या पक्षाला करा असे समजावून सांगितले होते. परंतु मतदाराने एकाच पक्षातील दोन नगरसेवक उमेदवाराला मतदान करून त्याच पक्षातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान केले की ? दुसऱ्या पक्षातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान म्हणजे क्रॉस मतदान केले की काय ? अशाही चर्चेला उधाण आले होते. दीर्घ प्रतीक्षा त्रासदायक मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. परंतु अचानक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचा आदेश दिल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरून धाकधूक वाढली आहे. उमेदवारांना एक एक दिवस फार मोठा वाटत असून २१ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करीत उमेदवार चिंताग्रस्त झाले आहेत.