Election: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ठरले; जाणून घ्या कोणाविरुद्ध कोण

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी ला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची तर औरंगाबाद, नागपूर, कोंकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मात्र महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा असणार आहे. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असला तरी मी काॅंग्रेसचा उमेदवार असल्याचे तांबे यांनी म्हंटले आहे. येथील भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. तर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने येथे आपला उमेदवार दिलेला नाही, भाजपनं नागो गाणार यांना पाठिंबा दर्शवला आहे.
अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीत काँग्रेस जागा लढवणार आहे. धिरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार आहेत. पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेब) व रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत.
कोकणात महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा असणार आहे. भाजपकडून येथे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून विक्रम काळे मैदानात उतरले आहेत.





