रांजणी : टाटा मेमोरियल सेंटर येथील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी (सीसीई) ने केलेले एका ऐतिहासिक जीनोम -वाईड असोसिएशन अभ्यासात तंबाखू खाणार्याला तोंडाचा कर्करोग इतरांपेक्षा जवळ जवळ दहा वर्षे लवकर का होतो हे उघड झाले आहे. द लॅन्सेट डिस्कवरी सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात विशिष्ट अनुवंशिक मार्कर ओळखले आहेत जे तोंडाच्या श्लेष्मल त्वचेच्या कर्करोगाचा (गालाच्या आतिल पृष्ठभागाचा कर्करोग) धोका लक्षणीयरीत्या वाढवतात अर्थात ग्रामीण भागात कर्करोग असणार्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे देखील आढळून आले आहे. दरम्यान हा कर्करोग देशातील सर्वात सामान्य आणि प्रतिबंध करण्यायोग्य कर्करोगापैकी एक आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, हा अभ्यास काही लोकांना समान जीवनशैली असूनही तोंडाचा कर्करोग लवकर का बरा होतो याचा पहिला मजबूत अनुवंशिक पुरावा देतो. शिवाय ही नवीन अनुवंशिक माहिती उच्च जोखीम गट ओळखण्यास, तपासणी मजबूत करण्यास आणि भविष्यात जनजागृती मोहीम मजबूत करण्यास मदत करू शकते. भविष्यात तंबाखू सेवन करणार्या व्यक्तींचा कॅन्सर आधीच जनुकीय चाचणीतून मोजता येऊ शकतो त्यावर प्रतिबंधात्मक उपचार सुरू करता येणे शक्य असल्याचे तज्ञांनी सांगितले. ग्रामीण भागात तोंडाचा कॅन्सर असणार्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. ग्रामीण भागातील लोक तंबाखूचा मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापर करतात तसेच पुरुषांप्रमाणे स्त्रीयादेखील तंबाखू मोठ्या प्रमाणात खातात. ग्रामीण भागातील लोकांना कॅन्सर बाबत अद्यापही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. कारण ग्रामीण भागातील पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना देखील तंबाखू खाण्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणूनच देशात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तोंडाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत असल्याचे कॅन्सर तज्ञांचे ठाम मत आहे. खरे तर कॅन्सरबाबत आणि विशेषत: तोंडाच्या कॅन्सरबाबत ग्रामीण भागात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत तोंडाच्या कॅन्सरचा संभाव्य धोका ओळखून ग्रामीण भागात आणि तंबाखुच्या सेवनाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. दरम्यान संशोधनातील मुख्य निष्कर्ष तोंडाच्या कर्करोगासाठी भारतीय लोकसंख्येची जनुकीय संवेदनशीलता जगातील इतर देशांपेक्षा जास्त आहे. या अभ्यासात देशभरातील 2 हजार 160 कर्करोग रुग्ण आणि 2 हजार 325 निरोगी व्यक्तींच्या जीनोम (डीएनए)चे विश्लेषण केले. संशोधकांनी टीईआरटी, एचएलए ही जनुके तोंडाच्या कर्करोगाशी थेट संबंधित असल्याचे आढळले. पोलिजेनिक रिस्क स्कोअर सर्वाधिक असल्यास तंबाखू सेवन करणार्या संबंधित व्यक्तीला कर्करोगाचा धोका 36 पट जास्त असल्याचे अभ्यासात समजले. यामध्ये तंबाखूच्या प्रकाराशी म्हणजेच गुटखा, पानमसाला, बिडी आणि सिगारेट यांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो रुग्ण टाटा मेमोरियल सेंटरने केलेल्या अभ्यासाच्या आधारे पॉलिजेनिक रिस्क स्कोअर विकसित केला आणि असे आढळून आले की जास्त अनुवंशिक संवेदनशीलता असलेल्या तंबाखू खाणार्यांना कमी धोका असलेल्यांपेक्षा सुमारे दहा वर्षे आधी तोंडाचा कर्करोग झाला. देशात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाचे अंदाजे 1 लाख 41 हजार 342 रग्ण नोंदवले जातात. भारत देशामध्ये तोंडाचा कर्करोग हा केवळ व्यसनांचा परिणाम नसून जनुकीय संवेदनशीलता देखील कारणीभूत असल्याचे टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे.