करवाढ रद्द करा नाहीतर…; ॲड. दीपक थिगळे यांचे टाकीवर चढून आंदोलन

राजगुरुनगर: कर वाढ रद्द करावी याचा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसलेल्याच्या विरोधात ॲड. दीपक थिगळे, स्वप्नील माटे यांनी टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. राजगुरुनगर परिषदेने केलेली करवाढ रद्द करावी, या मागणीसाठी थिगळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग आदींना यासंदर्भात निवदन दिले होते.
त्यावर कारवाई न झाल्याने ॲड. थिगळे यांनी खेड पंचायत समितीच्या पुढे दि. १०मार्च ते १४ मार्च असे चार दिवसांचे उपोषण केले होते. या दरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी पॉईंट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत विधानसभा अधिवेशनात याविषयीचा मुद्दा उचलून धरला होता. सबंधित खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आठ दिवसात हा विषय मार्गी लावला जाईल. सबंधित विभागाने तत्काळ अहवाल द्यावा, कारवाई करावी आहे, उत्तर दिले होते. मात्र १५ दिवस उलटूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने थिगळे यांनी टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
आज दि. १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ॲड. दिपक थिगळे यांनी प्रांत कार्यालयाजवळ असलेल्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सध्या तरी त्यांना अपयश आले आहे. दरम्यान आंदोलन केलेल्या टाकीजवळ आगे मोहोळाचे माशांसह सात पोळे असल्याने ॲड दीपक थिगळे यांच्या जीवितास मोठा धोका आहे. शासनाकडून यावर तत्काळ निर्णय होणे अपेक्षित आहे.





