Donald Trump: इलॉन मस्क यांच्याकडे सोपवणार राष्ट्रपतीपद? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…

Donald Trump’s Statement: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झालेली डोनाल्ड ट्रम्प जानेवारी 2025 मध्ये पदभार स्विकारणार आहेत. ट्रम्प यांच्या या विजयात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या प्रशासनात मस्क यांच्याकडे महत्त्वाची भूमिका असणार आहे. मस्क यांच्या वाढता प्रभाव पाहता, ते अमेरिकेचे राष्ट्रपती होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच उत्तर दिले आहे.
‘इलॉन मस्क हे कधीच अध्यक्ष होणार नाही’, असे म्हणत ट्रम्प यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून सातत्याने ‘राष्ट्रपती मस्क’ असे म्हणत ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला जात आहे. तसेच, ट्रम्प पुढे जाऊन राष्ट्राध्यक्षपद मस्क यांच्याकडे सोपवतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
या टीकेला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, ‘मस्क हे अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकत नाही. असे पुढेही घडणार नाही. तुम्हाला यामागचे कारण माहितीये का? कारण, त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही.’
अमेरिकेच्या संविधानानुसार, केवळ त्या देशात जन्मलेली व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकते. इलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. त्यामुळे ते जगातील महासत्तेचे कधीच राष्ट्रपती होऊ शकणार नाही. ट्रम्प यांनी मस्क हे राष्ट्रपती होऊ शकणार नाही असे स्पष्ट करतानाच निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये मस्क हे महत्त्वाचे डोनर होते, असे म्हणत त्यांच्या कामगिरीचे कौतुक देखील केले.





