13 ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाची हाक; आक्रमक विदेशी व्यापार धोरणांविरोधात शेतकरी-कामगार संघटनांचा एल्गार

नवी दिल्ली – व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये. भारताने अमेरिकेसह ब्रिटन आणि इतर देशाच्या आक्रमक व्यापाराला रोखण्याची गरज आहे, या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आणि कामगार संघटना 13 ऑगस्ट रोजी देशभर निदर्शने करणार आहेत.
अमेरिकेच्या आयात शुल्काला आणि ब्रिटनबरोबर झालेल्या व्यापार कराराला या निदर्शनावेळी विरोध करण्यात येईल असे कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. या निदर्शनात विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घ्यावा. ट्रॅक्टर मोटार सायकल रॅली काढाव्यात. त्याचबरोबर निषेध सभा घ्याव्यात असे आवाहन या संघटनांनी केले आहे.
ट्रम्प यांच्या आयात शुल्काची धमकी भारताने फेटाळून लावावी. त्याचबरोबर कोणत्याही देशाबरोबर व्यापार करण्याचा आपला सार्वभौम अधिकार अबाधित ठेवावा. रशियाबरोबर व्यापार करू नये, या अमेरिकेच्या धमकीला फेटाळून लावावे असेही आवाहन या संघटनांनी सरकारला केले आहे.
ब्रिटनबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारातील काही तरतूदीना या संघटनांनी विरोध करून या कराराचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा थांबवावी. अन्यथा अमेरिका भारतातील शेतकरी आणि कंपन्यांची पिळवणूक करण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले.सरकारने कोणत्याही देशाबरोबर गुप्त चर्चा करू नये. जी चर्चा झाली आहे त्याचा तपशील संसदेत मांडावा असे मागणी करण्यात आली.
उघड विरोध करण्याची मागणी
अमेरिका भारताच्या व्यापाराबाबत रोज नव्या धमक्या देत आहे. मात्र त्या प्रमाणात भारत सरकार या धमक्याचा विरोध करीत असल्याचे दिसून येत नाही. भारत सरकारने अमेरिकेला उघड विरोध करावा. स्वतःचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना या कामगारांनी शेतकरी संघटनांनी भारत सरकारला केले आहे.

