वैष्णवदेवी भाविकांसाठी कॉल सेंटर सुरू

जम्मू – जम्मू काश्मीरच्या वैष्णव देवी तीर्थ स्थळी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी कटरा या बेसकॅम्पवर एक कॉल सेंटर सुरू करण्यात आले असून राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते काल त्याचे उद्घाटन झाले. हे कॉल सेंटर भाविकांसाठी 24 तास सुरू राहणार आहे.
त्याद्वारे भाविकांच्या सर्व तक्रारी तातडीने दूर केल्या जाणार असून यात्रेच्या स्थितीच्या संबंधातील माहितीही जगभरातील भाविकांना त्वरेने उपलब्ध होणार आहे. वैष्णवदेवी परिसरातील हवामान, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची व हेलिकॉप्टर्सची उपलब्धता आदी माहितीही भाविकांना याद्वारे मिळू शकणार आहे.

तसेच या कॉल सेंटरद्वारे इमर्जन्सी वैद्यकीय मदतही उपलब्ध केली जाणार आहे. या कॉल सेंटर्सद्वारे भाविकांना एसएमएस आणि इमेलद्वारेही माहिती दिली जाणार आहे.
श्री माता वैष्णवदेवी श्राईन बोर्डाचे सीईओ रमेशकुमार यांनी राज्यपालांना या सेवेची सारी माहिती सादर केली. सहा केंद्रांवरून हे कॉल सेंटरचे काम चालणार आहे. नंतरच्या टप्प्यात ही केंद्रे तीस केली जाणार आहेत.





