Cable Theft Gang: केबल चोरणारी टोळी जेरबंद! पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; १२ गुन्हे उघड
Cable Theft Gang: जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आरोपींना नाशिकच्या घोटी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

Cable Theft Gang – जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले असून या आरोपींकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच सुमारे ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. केबल चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या सिंचनावर परिणाम होत असून विशेषतः उन्हाळ्याच्या काळात मोठे नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दुर्गम भागात घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथवा सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करणे अवघड ठरत होते.
या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची बैठक घेऊन २०२६ मधील गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने घटनास्थळांचा अभ्यास केल्यानंतर केबल चोरी एकाच टोळीकडून होत असल्याचा संशय व्यक्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
त्यावेळी चोरी करणारे आरोपी मध्यप्रदेशातील असून चोरीच्या ठिकाणांच्या परिसरात तात्पुरते वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, महादेव शेलार व प्रवीण संपांगे यांच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरात कारवाई करून सुरज उर्फ लोंडीलाल रामसर आदिवासी (वय ४०, रा. कुंदेवाडी, ता. सिन्नर), कपसलाल सर्कस पवार (वय ५०), आराजा छत्तेसिंग पवार (वय १९),
अतुल शापिलाल चव्हाण (वय २१) आणि गगन शापिलाल चव्हाण (वय २०), सर्व रा. माणिकखांब, ता. इगतपुरी यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील केबल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ८ लाख १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.





