Eknath Shinde – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसहिंता कोणत्याही क्षणी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या बैठकींचा सपाटा आवरत नाहीये.
गुरुवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर आणखीन एक बैठक तीन दिवसांच्या अंतराने लावावी. त्यासाठीचा अजेंडा जाहीर करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले असल्याने मंत्रालयीन कर्मचारी देखील चक्रावले आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीत सुमारे साठ ते सत्तर दरम्यान विषय चर्चेले गेल्याची माहिती आहे. तथापि गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत बैठकीतील विषय ठरले नव्हते. सरकारी बाबूंच्या नजरेखालून जोवर विषय मंजूर होत नाही.
तोवर बैठकीचा अजेंडा मंजूर समजता येत नाही, असा भन्नाट युक्तीवाद मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. मात्र काही महत्वाचे निर्णय राहिले असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे ही बैठक असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
तथापि मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याचे अपेक्षित असतानाच अजून राज्याच्या हिताचे काही निर्णय बाकी असून त्यासाठीच्या अजेंडा तयार करावा असे, आदेश मुख्यमंत्र्यांनी सचिव कार्यालयास दिले आहेत. आठ तारखेला शक्य नसेल तर १२ तारखेचाही पर्याय तपासून घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
परंतु या बैठकांतील निर्णयाची अंमलबजावणी होणार तरी कधी व कशी? यावरुनही मुख्यमंत्री कार्यालयात अस्वस्थता पसरली आहे. यापूर्वीच्या तीन तीन बैठकातील मंजूर ईतिवृत्तास नंतरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेले नाही. मग याचे थेट अध्यादेश काढून अंमलबजावणी होणार आहे का? अशी शंकाही मुख्यमंत्री कार्यालयातच व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री धडाकेबाज, पण…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकाबाबंत अशी निर्णयांची हेळसांड होते हे पाहून मुख्यमंत्री धडाकेबाज आहेत. त्यांना कामाची आवड आहे. वेगवान कामासाठी ते शासन कार्यपध्दतीत शॉर्टकटही मारतांत; परंतु अंमलबजावणीची यंत्रणा उदासीन व सहकार्य न करणारी असल्याचे सरकार पक्षातील घटक पक्षांचे मत आहे.