C.P.Radhakrishnan : निवडणुकीतील लाभासाठी राधाकृष्णन यांना उमेदवारी; द्रमुकने साधला भाजपवर निशाणा

चेन्नई : केंद्रातील सत्तारूढ एनडीएने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. ते मूळचे तमिळनाडूचे आहेत. तसे असले तरी तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला जाणार नसल्याचे संकेत दिले. तसेच, निवडणुकीतील लाभावर डोळा ठेऊन राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.
राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झाल्याने एनडीएचे घटक नसणारे तमिळनाडूतील राजकीय पक्ष काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, द्रमुकचे ज्येष्ठ नेते टी.के.एस. एलंगोवन यांनी प्रतिक्रिया दिली. राधाकृष्णन हे भाजपमधील नेते आहेत. उपराष्ट्रपती बनल्यास त्यांना बढती मिळेल. त्या घडामोडीचे तमिळनाडूच्या भल्याशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे राधाकृष्णन यांना द्रमुकने का पाठिंबा द्यावा? उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत विरोधी पक्षांची इंडिया आघाडी घेईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहू, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकने तमिळनाडूतील सर्वपक्षीय खासदारांना राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तमिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होईल. ती विचारात घेता राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचे राजकीय महत्व आणखीच वाढले आहे.





