पुणे जिल्हा | जंक्शन एमआयडीसीफचा प्रश्न मार्गी

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 131 हेक्टर 50 आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी (दि. 14) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने जंक्शन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला असून इंदापूरकरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
इंदापूर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जंक्शन येथील एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती.
या एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जंक्शन येथील 20 हेक्टर 38 आर., भरणेवाडी येथील 24 हेक्टर 24 आर., अंथुर्णे येथील 21 हेक्टर 18 आर., लासुर्णे येथील 65 हेक्टर 70 आर.,अशी एकूण 131 हेक्टर 50 आर एवढे क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन इंदापूर तालुक्याचा हा प्रश्न मार्गी लावला आहे, त्यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह इंदापूरकरांनी उपुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.





