पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू झालेल्या मेट्रोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांमध्ये 37 हजार 402 जणांनी पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर मेट्रोने प्रवास केला आहे. त्यातून 5 लाख 2 हजार 730 रूपयांचे उत्पन्न महामेट्रोस मिळाले आहे.
सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत प्रत्येक अर्ध्या तासाला मेट्रो धावत आहे. पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतराचा प्रवासासाठी 20 रूपये तिकीट असून, पुन्हा रिर्टनचे तिकीट काढल्यास 30 रूपयात येऊन-जाऊन प्रवास करता येतो. त्यासाठी नागरिक सकाळपासून स्टेशनवर गर्दी करीत आहेत.
अनेकजण या सफरीचा आनंद घेत फोटोसेशन करत असतानाही दिसून येत आहे. मेट्रोतून पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर रविवारी (दि.6) 9 हजार 438 प्रवाशांनी प्रवास केला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.7) 5 हजार 943 जणांनी मेट्रोची सफर केली. तिसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.8) तब्बल 16 हजार 458 नागरिकांनी मेट्रोचा आनंद घेतला.
महिला दिनानिमित्त भाजपकडून मेट्रो तिकीट फ्री असल्याने त्या दिवशी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तर, चौथ्या दिवशी बुधवारी (दि.9) 5 हजार 563 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. चार दिवसांत एकूण 37 हजार 402 जणांनी प्रवास केला.