नवी दिल्ली : सोने आणि चांदीचे दर वाढण्यासाठी कमालीची पोषक परिस्थिती सध्या जागतिक बाजारात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर रोज नव्या विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत. सोन्याचा दर तब्बल 1,800 रुपयांनी वाढून 1 लाख 15 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 570 रुपयांनी उसळून 1 लाख 32 हजार 870 रुपये प्रति किलो या नव्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर गेला आहे. रशिया- युक्रेन युद्ध, इस्त्रायल – हमास युद्ध या कारणामुळे सोने-चांदीचे दर गेल्या एक वर्षापासून वाढत आहेत. त्यातच जानेवारीपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांविरोधात एकतर्फी व्यापार युद्ध सुरू केल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत गेली. आता अमेरिकेतील खराब परिस्थितीमुळे डिसेंबर पर्यंत फेडरल रिझर्व दोन ते तीन वेळा व्याजदर कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 17 सप्टेंबरला अमेरिकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे इतर मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत होण्याबरोबरच अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. ही गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. दुसरीकडे गेल्या एक महिन्यापासून रुपया कमकुवत होत असल्यामुळे सोन्याची आयात भारतात महागात पडत आहे. किंबहुना ऑगस्ट महिन्यात याच कारणामुळे सोन्याची आयात जवळजवळ 56 टक्क्यांनी कमी झाले आहे. अशा परिस्थितीत भारतामध्ये सोन्याचे दर अधिकच वाढत आहेत असे व्यापार्यांनी सांगितले. एचडीएफसी बँकेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या दहा आठवड्यांच्या निचांकावर म्हणजे 97.04 अंकावर आहे. यामुळे या कालावधीत सोन्याचे दर वाढत गेले. आता अमेरिकेत व्याजदर कपात झाल्यास महागाई वाढेल. अशा परिस्थितीत डॉलर संबंधित वित्तीय उत्पादनातून सोन्यापेक्षा कमी परतावा मिळेल असे गुंतवणूकदारांना वाटणे साहजिक आहे. अमेरिकेच्या पतधोरणाकडे लक्ष अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची बैठक सुरू झाली आहे. उद्या पतधोरण जाहीर होईल. व्याजदर कपातीच्या आशेमुळे शेअर बाजारात आणि सोने चांदी बाजारात तेजी आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कपात नेमकी किती होते, त्याचबरोबर आगामी काळात व्याजदर कपातीबाबत फेडरल रिझर्व काय भूमिका सुचित करते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. व्यापार युद्ध आणि भूराजकीय तणाव या कारणामुळे सोन्याचे दर लघु पल्ल्यात तरी उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.