पुणे -किरकोळ बाजारात खरेदीसाठी जाणारे सामान्य ग्राहक दोन हजारांची नोट व्यापारी, दुकानदारांना देऊ लागले आहेत. दोन हजारांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सामान्य ग्राहक आणि किरकोळ बाजारातील विक्रेत्यांमध्ये संभ्रम कायम आहे. दोन हजारांच्या नोटेवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी “उधारीवर माल घ्या, पण दोन हजारांची नोट खपवू नका’ अशी भूमिका घेतली आहे.
दोन हजारांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर किरकोळ बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या अनेकांनी दोन हजारांच्या नोटा कपाटातून बाहेर काढल्या आहेत. सामान्य नोकरदारांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा फारशा नसतात. पण, अनेकांनी तातडीने पैसे लागल्यास दोन हजारांच्या पाच ते दहा नोटा घरात ठेवल्या होत्या. तरीही काहींनी मोठ्या रक्कमेची गरज असल्याने साठवून ठेवल्या होत्या. अशा नोटा आता किरकोळ बाजारातील व्यवहारात दिसू लागल्या आहेत. किराणा माल, पेट्रोल पंपचालक तसेच अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.
किराणा माल विक्रेते आणि ग्राहकांचा नियमित संपर्क असतो. किराणा माल विक्रेत्यांकडे दोन हजार रुपयांची नोट देऊन खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अनेकांनी नियमित ग्राहकांची मने न दुखावता उधारीवर सामान खरेदी करा, पण दोन हजारांची नोट देऊ नका, अशी भूमिका घेतली आहे.
नागरिकांनी बॅंकेतून बदलून घ्याव्यात अथवा खात्यात नोटा भराव्यात
सामान्य माणसांना बॅंकेतून नोटा बदलून घेण्याचा अथवा खात्यात पैसे भरण्याचा पर्याय आहे. मात्र, हे लोक बॅंकेत जात नाहीत. दुकानदार अथवा पेट्रोल पंपावर नोटा देण्यावर त्यांचा भर आहे. यापेक्षा नोटा बॅंकेत भरणे सोईचे होईल. तशीच पद्धत त्यांनी वापरावी, असे आवाहन दि पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले आहे.
नियमित दुकानदारांकडून किराणा खरेदी केला. त्याचे 370 रुपये बिल झाले. दोन हजार रुपयाची नोट दिली. त्यावेळी दुकानदाराने दोन हजार नको, तुम्ही नियमित येता. पैसे नसल्यास नंतर द्या, अशी भूमिका घेतली.
– अश्विनी जोशी,गृहिणी, धनकवडी.