छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये भरदिवसा जमिनीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. संभाजीनगरमधील नवाबपुरा भागात ही घटना घडली आहे. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने व्यावसायिकावर गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हसीब मोहम्मद असं गोळीबार करण्यात आलेल्या जमीन व्यावसायिकाचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? हसीब मोहम्मद पहाटे दूध आणण्यासाठी आपल्या स्कुटीवरून गेले होते, त्यावेळी अज्ञाताने त्याच्यावर गोळीबार केला. ही गोळी स्कुटीला लागली तेव्हा हसीब मोहम्मद यांना गाडीचं टायर फुटला, असं वाटलं, त्यामुळे हसीब स्कुटीवरून खाली उतरले आणि गाडीचा टायर तपासायला लागले. तेव्हाच त्यांना समोर सहा फूट उंचीचा सडपातळ इसम उभा असलेला दिसला, या इसमाने हसीब मोहम्मद यांच्या दिशेने आणखी एक गोळी झाडली, ही गोळी त्यांच्या डोक्याजवळून गेली आणि हसीब थोडक्यात बचावले. यानंतर घाबरलेल्या हसीब मोहम्मद यांनी लगेचच गाडी चालू करून घरी धाव घेतली आणि मित्राला घेऊन जिन्सी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हसीब मोहम्मद यांच्या या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत, तसंच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.