Manipur – मणिपूरमधील व्यावसायिक दहशतवादी आणि बंडखोरांच्या संघटनांकडून खंडणीसाठी दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे धास्तावले आहेत. तशा धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पेट्रोल पंपचालकांनी थेट कामबंदचा इशारा दिला आहे. मणिपूर राज्यात मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडली. त्यातून त्या राज्यात प्रदीर्घ काळ हिंसाचाराच्या घटना घडल्या. टीकेचे धनी बनल्याने अखेरीस भाजपचे नेते एन.बिरेन सिंह यांनी फेब्रुवारीत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे लोकनियुक्त सरकार नसल्याने काहीशी पेचाची स्थिती आहे. त्या स्थितीचा गैरफायदा घेऊन दहशतवादी-बंडखोरांच्या संघटना व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत आहेत. त्यामुळे जीविताला, मालमत्तेला धोका असल्याच्या तक्रारी व्यावसायिकांकडून केल्या जात आहेत. त्यांची दखल घेऊन पोलिसांनी धमक्या देणाऱ्या अनेकांना अटकही केली. त्यानंतरही खंडणीसाठी धमक्यांचे सत्र थांबलेले नाही. सुरक्षेची निश्चिती व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेने राज्यपाल अजयकुमार भल्ला यांची भेट घेतली. मात्र, खंडणीखोरांच्या कारवाया थांबलेल्या नसल्याने त्या संघटनेने चालू आठवड्याच्या अखेरीस कामबंद संदर्भात निर्णय घेण्याचे सूचित केले आहे. तूर्तास पोलिसांनी पेट्रोल पंपांना सुरक्षा पुरवण्याची ग्वाही दिली आहे.