Bus Driver Vs Rickshaw Driver – “बस थांबवा… नाही, बसच थांबली!” असा प्रसंग गुरुवारी (दि. २९) दुपारी निगडीतील यमुना नगर येथे अनुभवायला मिळाला. पीएमपी बसचा किरकोळ धक्का रिक्षाला लागल्याच्या रागातून एका रिक्षाचालकाने थेट बसची चावी काढून घेत पोबारा केल्याने काही काळ बस अडकून राहिली.मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौकाच्या दिशेने जाणारी पीएमपीची ३५५ क्रमांकाच्या मार्गाची बस (एमएच १२ वायबी ७२४९) दुपारी सुमारे दीड वाजता मार्गक्रमण करत होती. याचवेळी बसचा धक्का एका रिक्षाला लागला. बस पुढे गेल्याने संतप्त रिक्षाचालकाने रिक्षा बससमोर आडवी लावत बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर “धक्का माझा की तुमचा?” या विषयावर जोरदार बाचाबाची रंगली.रिक्षाचालकाने नुकसानभरपाईची मागणी केली; बसचालकाने नियमांचा आधार घेत नकार दिला. यावर रिक्षाचालकाने “भरपाई नाही तर चावी तरी!” असा निर्णय घेत बसची चावी काढली आणि थेट घटनास्थळावरून पसार झाला. परिणाम? बस रस्त्याच्या कडेला, प्रवासी ताटकळत, आणि वाहतूक थोडीशी विस्कळीत. अखेर प्रवाशांनी बसमधून उतरून इतर वाहनांचा आधार घेतला. मात्र, बस अनेक तास ‘की-लेस’ अवस्थेत उभी राहिली. कारवाई नाही बस चालक-वाहकांनी याबाबत वरिष्ठांना कळविले. त्यानंतर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे शुक्रवारी दुपारपर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पीएमपीएमएलकडून कारवाईबाबत स्पष्टीकरण नव्हते.