पुणे – मार्केट यार्डातील सुमारे 100 कोटींचा भूखंड अवैधरीत्या आडत्यांना देण्याच्या हालचाली पुणे बाजार समितीकडून सुरू आहेत, अशातच आता सावित्रीबाई फुले बुरुड समाज बांबू व्यापारी असोसिएशनने या प्रकरणात उडी घेतली आहे. मार्केटयार्ड मुख्य प्रवेशद्वारासमोरील संबंधित भूखंड बांबू मार्केटसाठी आरक्षित असल्याने तो आडत्यांना दिल्यास तीव्र आंदोलन करू, वेळप्रसंगी न्यायालयीचे दार ठोठाऊ, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.
बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली असताना दुसरीकडे बाजार समिती प्रशासनाने प्रस्तावित अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेला सुमारे 100 कोटी रुपयांचा भूखंड काही विशिष्ट आडत्यांच्या गटाला तुटपुंज्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी भाडेकरार देखील केला आहे. मात्र, मार्केटयार्डातील प्रवेशद्वारासमोरील जागा स.नं. 559/अ-2/ब-2 येथील सुमारे एक हेक्टर 14 आर ही जागा सावित्रीबाई फुले बुरुड समाज बांबू व्यापारी असोसिएशनला आरक्षित केलेली आहे. याची नोंद राज्य सरकारच्या आणि बाजार समितीच्या गॅझेटमध्येही आहे. ही जागा बांबू मार्केटसाठी आरक्षित असल्याचे नमूद आहे.
बुरुड समाजासाठी आरक्षित जागा असताना कृषी उत्पन्न बाजार समिती बुरुड समाजाला जागा देण्यास टाळाटाळ करत आहेत. समितीने उत्पन्न मिळविण्यासाठी त्या जागेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे. सध्या, त्या ठिकाणी ट्रकचे “पे अँड पार्क’ केले आहे. तर, आता ती जागा डाळिंबासह लिंबू आणि केळीच्या व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमची हक्काची जागा परत मिळावी. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून ही जागा आडत्यांना दिल्यास आंदोलन करू.
– सचिन पवार, अध्यक्ष, बुरुड समाज बांबू व्यापारी असोसिएशन