प्रभात वृत्तसेवा पुणे – शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक विधी महाविद्यालय रस्त्यावरील शांतिलीला सोसायटीत राहात असून, २९ जुलै रोजी मध्यरात्री चोरटे सोसायटीत शिरले. त्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र लांबविले. बुधवारी (३० जुलै) सायंकाळी ज्येष्ठ नागरिक घरी परतले. तेव्हा चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक चांदणी शेंडे तपास करत आहेत.दरम्यान, विश्रांतवाडीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाइल संच, मनगटी घड्याळे असा २९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी एका महिलेने विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली अहे. तक्रारदार महिला टिंगरेगनर भागातील एका सोसायटीत राहात असून, त्या १२ जुलै रोजी नागपूरला गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन मोबाइल संच, मनगटी घड्याळे असा ऐवज लांबवला. पोलीस उपनिरीक्षक लाखे तपास करत आहेत. उपनगरांत गस्त वाढविण्याचे आदेश शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात ज्येष्ठ महिला राहात असलेल्य सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. विश्रांतवाडी, वारजे माळवाडी भागांतही सदनिकेचे कुलूप तोडून १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, अशा सदनिकांची पाहणी करून चोरटे ऐवज लांबवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली. घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपनगरांत गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच घरफोडी करणाऱ्या सराईतांची चौकशी करण्यात येत आहे.