Crime News : राक्षेवाडीत घरफोड्या; ९ लाखांचा ऐवज लंपास
Crime News : नवीन चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी ठेवलेली ४ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चैन आणि ३५ हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा असा ऐवज चोरून नेला.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील शिक्षक कॉलनीत बुधवारी (दि. २१) पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून ८ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरांचे मुख्य दरवाजे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घटनेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने राजगुरुनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र दिनकर गिरीगोसावी हे राक्षेवाडी येथील भोलेनाथ रो हाऊस क्रमांक ८, शिक्षक कॉलनी येथे राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या हॉलमधील मुख्य दरवाजाच्या लॅचचा भाग तोडून आत प्रवेश केला. नवीन चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी ठेवलेली ४ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चैन आणि ३५ हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा असा ऐवज चोरून नेला.
यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणारे हौशीराम दगडू कुटे यांच्या घराला लक्ष्य केले. त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हॉलमधील लाकडी व लोखंडी कपाट फोडले. दिवाळीत सोने खरेदी करण्यासाठी ठेवलेली अंदाजे ३ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या दोन्ही घरफोड्यांप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष मोरे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. कुदळे करीत आहेत.





