पुणे जिल्ह्यात बैलगाड्या रस्त्यावर सोडून ठिय्या

माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे यांना आंदोलकांनी हुसकावले
सासवड – मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुरंदर तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाकडून पाचव्या दिवशी सुपे ग्रामस्थांनी सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास आभिवादन करून पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले.
शिवतिर्थावर आंदोलन सुरू असताना राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच आंदोलन स्थळी येण्यास मराठा क्रांती मोर्चाचे वतीने आवाहन करण्यात आले होते. दरम्यान आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी आलेल्या माजी आमदार अशोक टेकवडे व भाजपचे नेते जालींदर कामठे यांना आक्रमक मराठा आंदोलकांनी धक्काबुक्की करत हुसकावून लावले.
तर गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे व रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून त्या फोटोचे दहन करण्यात आले. माहिती व जन संपर्क कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहीती देण्यासाठी सासवड येथे आलेला जनसंपर्क रथावरील माहितीफलक मराठा आंदोलकांचे वतीने शासनाचा निषेध करत फाडण्यात आले.





