पुसेगाव -खटाव तालुक्यात खटाव गावच्या हद्दीत हुसेनपूर नावाच्या शिवारात व धारपुडी येथे लवंगार मळा नावाच्या शिवारात बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन केल्या प्रकरणी आयोजकांची तीन चारचाकी वाहने पुसेगाव पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी बैलगाड्यांचे चालक, मालक व आयोजकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भादंवि कलम 188, प्राण्यांना निर्दयपणे वागविणे, प्रतिबंधक कायदा कलम 11 (1) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटावच्या हद्दीत हुसेनपूर नावाच्या शिवारात सकाळी 0.30 च्या सुमारास बैलगाडी शर्यती होणार असल्याची माहिती पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली. त्यानुसार घोडके, पोलीस उपनिरीक्षक लोंढे, कर्मचारी सचिन जगताप, किरण देशमुख, सरक व जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे अनेक लोकांसह चार बैलगाड्या, वाहने दिसली.
पोलिसांना पाहताच काही जणांनी बैलगाड्यांसह पलायन केले. मात्र, घटनास्थळावरून बोलेरो मॅक्सी पिकअप (एमएच-50-8151) चा मालक प्रशांत अशोक पवार (रा. वहागाव, ता. कराड), विश्वजित विश्वास माळी (शिवडे, ता. कराड), एमएच-10-सीआर-4242 या वाहनाचा मालक प्रसन्न राजेंद्र देशमुख (रा. निसराळे), चालक खंडू श्रीरंग गुजले (रा. लेंगरे, ता. खानापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बैल व बैलगाड्या संशयितांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देऊन इतरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर सकाळी 11.30 च्या सुमारास धारपुडी गावच्या हद्दीतील लवंगार मळा या शिवारात छापा टाकून पोलिसांनी बोलेरो मैक्सी पिकअप (एमएच-11-बीएल-6565) या वाहनाचा चालक मंगेश मोहन पवार (शिवथर, ता. सातारा) व बैलांचा मालक सूरज दिलीप सकुंडे (रा. अरबवाडी, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.