Bailgada Sharyat Accident – करंदी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीतील एका इच्छुक उमेदवाराने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलाची धडक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रकाश महादू फटांगडे (वय ३५, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर) असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा पळाल्यानंतर, तो पकडण्यासाठी प्रकाश फटांगडे गेले होते. त्यावेळी बैलाची जोरात धडक बसल्याने ते जमिनीवर पडले. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत गोरक्ष महादू फटांगडे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड पुढील चौकशी करत आहेत. आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करंदी येथे कोणतीही यात्रा नसताना बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आयोजकांनी सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या दुर्घटनेला आयोजक जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. वेळप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.