प्रभात वृत्तसेवा आळंदी – मरकळ रस्त्यावरील कोकणस्थ धर्मशाळेसमोरून दि. २७ रोजी भर दुपारी बुलेट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एम.एच. १४ एल.जी. ७९५६ या क्रमांकाची ही बुलेट मालक अभिषेक राजेंद्र अंबिरकर यांनी धर्मशाळेबाहेर उभी केली होती.याबाबत अभिषेक अंबिरकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे, चोरीची ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंबिरकर यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून दिले आहे, मात्र पोलिसांकडून केवळ तपास सुरू असल्याचे मोघम उत्तर मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.घटनेला चार दिवस उलटूनही चोरीला गेलेल्या बुलेटचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुरावा उपलब्ध असूनही पोलीस प्रशासनाकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप वाहन मालकाने केला आहे. तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.