वाघापूर : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या पिसर्वे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आरोग्य केंद्राचे अतिक्रमण अखेर ‘फिक्स’ झाले. राजकीय हस्तक्षेपाने अखेर चिमुकल्यांच्या मैदानाचा घास घेतला. प्रचंड विरोध व वादविवादानंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा तीव्र विरोध असताना देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरु केले. मुलांच्या हक्काच्या मैदानावर होत असलेल्या सरकारी अतिक्रमणामुळे पालक संतप्त झाले. त्यांनी पुरंदरच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे विशेष ग्रामसभेची मागणी केली आहे. शालेय शिक्षण आणि आरोग्य त्या दोन्ही गोष्टी गावाला अत्यावश्यक आहेतच. मात्र यावर ग्रामसभेच्या माध्यमातून सुवर्ण मध्य काढण्याएवजी प्रशासन करीत असलेली कुरघोडी पाहता. मुलाचे मैदान वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच यात लक्ष द्यावे लागणार आहे. प्रोटोकॉल तोडून भूमिपूजन करण्यात आल्याने पालक संतापले आहेत. विकासकामांच्या बाबत असलेला प्रोटोकॉल पिसर्वे येथे तोडण्यात आला. याचे तीव्र पडसाद उमटले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे व पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर व माऊली यादव यांच्या अनुपस्थितीत कोट्यावधी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करून काम सुरु करण्यात आले. याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेचे मैदान हे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आणि खेळासाठी राखीव असते, मात्र, याच जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित करून प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने यापूर्वीच ठराव देऊन बांधकामाला विरोध दर्शविला होता. आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहेच. परंतु त्यासाठी मुलांचे मैदान हिरावून घेणे कितपत योग्य आहे. – हनुमंत कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. प्राथमिक शाळेच्या मैदानात आरोग्य केंद्र बांधण्याच्या विरोधात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी लेखी स्वरूपात विरोध करून देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रत्यक्ष बुलडोझरच्या सहाय्याने काम सुरु केले आहे. शाळेच्या आवारात अशाप्रकारे बांधकाम झाल्याने भविष्यात शाळेच्या विस्ताराला व खेळाला जागाच उरणार नाही -रोहिदास कोलते, शिक्षण तज्ज्ञ शाळा व्यवस्थापन समिती. हेही वाचा : Pune District : खेड तालुक्यात काँग्रेसचे संघटन सुदृढीकरण शिबिर