बुलडाणा : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून आलेल्या ट्रेलरने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर खामगाव- नांदुरा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुलडाण्याच्या खामगावजवळ दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या अपघातात एका चालत्या ट्रकमध्ये इंजिनचा आवाज यायला लागल्याने चालकाने ट्रक उभा करत कुठून आवाज येत आहे हे तपासत होता. याच वेळी मागील बाजूने एक ट्रेलर वेगाने येऊन उभ्या ट्रकला धडकला. या अपघातात ट्रेलरमधील चालक व क्लिनर दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अपघाताची खामगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावर येऊन मृतकांना बाहेर काढले आहे. जिल्ह्यातील खामगाव- नांदुरा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. खामगाव शहरातील टाटा कॅपिटल कंपनीमध्ये काम करणारे दोन कर्मचारी नांदुरा येथे कंपनीच्या कामानिमित्त गेले होते. परत खामगावकडे येत असताना चिखली आमसरी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने गाडी टाकली असता समोरून येणा-या अज्ञात वाहनाच्या धडक दिली.