पुणे जिल्हा | पुराचे पाणी जाण्यासाठी मोरी बांधा

पारगाव, (वार्ताहर)- चौफुला – न्हावरा केंद्रीय महार्गावरील पारगाव येथील भीमा नदीतील पुराचे पाणी जाण्यासाठी पुलाच्या दक्षिण व उत्तर बाजूस मोठ्या बॉक्स मोरी बांधण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमधून होत आहे.
प्रत्येकवेळी भीमा नदीला पूर आल्यानंतर या ठिकाणच्या पुलाच्या भरावामुळे पाणी दोन्ही बाजूस शेतात शिरते. याच ठिकाणी जुन्या पुलाच्या शेजारी नवीन पुलाचे काम चालू आहे. रस्त्याची उंची वाढणार असल्याने पाणी पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात परिसर व्यापणार आहे. यावेळी हा अनुभव आला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार असून नजीक राहत असलेल्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. नदीला पूर आल्यानंतर एक हजार क्यूसेकच्या आसपास पाणी या ठिकाणावरून वाहत असते. याशिवाय नदीवरील कृषी पंप चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी मोरीचा उपयोग होणार आहे. पुलाच्या दोन्ही भरावांच्या बाजूला काही अंतरावर २० फूट रुंदीच्या बॉक्स मोरी बांधावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
पूर्वी नदीला पूर आल्यानंतर रस्त्यावरून पाणी पलीकडे पडायचे. आता रस्त्याची उंची वाढल्याने पाणी गावाकडील बाजूस येणार असल्याने तेथे मोठ्या बॉक्स मोऱ्या बनविणे गरज आहे. – विशाल ताकवणे, शेतकरी, पारगाव.
दोन्ही बाजूला बॉक्स बनविण्यासाठी मोरी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सहकार्य मिळाल्यास मोरीचे काम त्वरित सुरू करण्यात येईल. – अनिल दळवी, प्रोजेक्ट मॅनेजर, निखिल कन्ट्रक्शन.





