श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये मोटरसायकलींवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. रमझानचा उपवास सोडण्यासाठी ब्रेड घेण्याच्या उद्देशाने बेकरीत गेलेले असताना या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
झिया-उल-हक आणि रानू मोंडल अशी शहीद झालेल्या बीएसएफच्या कॉन्स्टेबलची नावे आहेत. ही घटना बुधवारी संध्याकाळी श्रीनगरच्या जवळच असलेल्या सौरा भागात झाली. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या “द रेसिस्टन्स फ्रन्ट’ या दहशतवाद्यांच्या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांनी बीएसएफच्या दोघा जवानांवर अगदी जवळून गोळीबार केला होता. या दोघांच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर ते अत्यंत दाटीवाटीच्या रहिवासी भागातल्या गल्लीबोळातून वेगाने पळून गेले. हक आणि मोंडल हे दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते. मात्र, अम्फान चक्रीवादळामुळे विमानतळ बंद असल्याने या दोघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार नाहीत.