‘बीएस-6’ मुळे वाहनांसह इंधनही महागणार

पेट्रोल 5 वर्षे 80 पैशांनी, तर डिझेल दीड रुपयांनी महागणार?
तेल कंपन्यांनी केली 80 हजार कोटींची गुंतवणूक
पुणे – बीएस-6 (भारत स्टेज-6) उत्सर्जन मानदंडाची वाहने दि. 1 एप्रिलपासून विकली जाणार आहेत. ती सध्याच्या बीएस-4 वाहनापेक्षा महाग असणार आहेत. बीएस-6 वाहनासाठी अधिक शुद्ध पेट्रोल आणि डिझेल लागते. तेल शुद्धीकरण यंत्रणेसाठी तेल कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. ती परत मिळण्यासाठी या कंपन्यांना दरवाढ करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, बीएस-6 वाहनासाठी इंधनाच्या शुद्धीकरणासाठी यंत्रसामुग्रीसाठी सरकारी तेल कंपन्यांनी 80 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. खासगी कंपन्यांनीही बरीच गुंतवणूक केलेली आहे. ही गुंतवणूक परत मिळविण्यासाठी या कंपन्यांना 5 वर्षे पेट्रोलच्या दरात 80 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपया 50 पैशांची वाढ करावी लागणार आहे.
हे पैसे सध्याच्या दरावर प्रीमियम म्हणून घेऊ देण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव तेल कंपन्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
सरकारने अगोदरच पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केलेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरानुसार भारतातील तेल कंपन्या या इंधनाचे दर दैनंदिन पातळीवर ठरवत असतात. या दराशिवाय या कंपन्या प्रीमियम आकारू इच्छित आहेत. मात्र, तेलाचे दर जास्त असताना प्रीमियम आकारू दिल्यानंतर तेलाचे दर आणखी जास्त वाढतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी पातळीवर असल्यानंतर या कंपन्यांना प्रिमियम आकारू देण्याच्या शक्यतेवर केंद्र सरकार विचार करू शकते.
अनेकदा राज्याच्या किंवा देशाच्या निवडणुका होत असताना या काळात तेल कंपन्या इंधनाची दरवाढ करत नाहीत. मात्र, निवडणुका झाल्यास दरवाढ करून ही तूट भरून काढीत असतात. अशाच प्रकारे इंधनाचे दर कमी असताना प्रीमियम आकारू देणे आणि इंधनाचे दर जास्त असताना प्रीमियम आकारू न देणे अशा शक्यतेवर केंद्र सरकार विचार करू शकते. मात्र, एवढी मोठी गुंतवणूक खात्रीने परत न आल्यास तेल कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता आहे.





