पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मयंक खरारे (राहणार, आंबील ओढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, ही घटना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळच्या समोर दुपारी सुमारे ३.१५ वाजता घडली. मयंक आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना जनता वसाहतीतील तीन मास्कधारी तरुणांनी पाठीमागून अचानक हल्ला केला. या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून जागीच ठार मारले. त्याचा मित्र अभिजीत इंगळे सुदैवाने बचावला, परंतु तो मानसिक धक्क्यात आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले आणि आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच कोंढवा परिसरात गणेश काळे याची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच शहरात कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.