पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ब्रदरचा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तसेच मृतदेहाच्या बाजूला इंजेक्शनही आढळून आले. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. ऋषिकेश अभिमन्यू माळी (वय 25, रा. लोहगाव, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वायसीएम रुग्णालयात ठेकेदारामार्फत ब्रदरचे काम करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ऋषिकेश याची गुरुवारी साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे तो लोहगाव येथील घरी नव्हता. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने आपले दाजी यांना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती रोडच्या बाजूला पडली असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याच्या बाजूला ऋषिकेश यांची दुचाकी लावलेली होती व ते रस्त्यावरती पडले होते. बेशुद्ध अवस्थेत त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऋषिकेश यांच्या मृतदेहाच्या बाजूला अड्रेन्यालीन या इंजेक्शनची बाटली आणि इंजेक्शनची सिरीज आढळून आली. हे जीवरक्षक औषध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनात ऋषिकेश यांच्या पोटात अल्कोहल आढळून आले. मात्र त्यांचा मृत्यू हृदयविकार किंवा अपघातामुळे झाला नसल्याचे दिसून आले. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे दिसून आले नाही. त्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचा व्हिसेरा काढून प्रयोगशाळेकडे तपासणी करता पाठविला आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतरच ऋषिकेश यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे दिसून येईल. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.